Saturday, April 14, 2007

"मराठी राष्ट्रवाद"

राष्ट्रवाद हा शब्द संस्कॄतीबद्दलच्या चर्चेसाठी सयुक्तिक वाटत नाही. कारण "मराठी संस्कॄती" हा विषय जेंव्हा आपण हाताळतो तेंव्हा आपण महाराष्ट्रातल्या प्रादेशिक संस्कॄतीबद्दल बोलत आहोत. संस्कॄती आणि राष्ट्रवाद ह्या दोन्ही गोष्टी जितक्या वेगळ्या तितक्याच व्यापक आहेत. राष्ट्रवाद हा मराठी असू शकत नाही, कारण मराठी संस्कॄती ही राष्ट्रव्यापी नसून आसेतुहिमाचल पसरलेल्या भारत राष्ट्राचा तो फक्त एक भाग आहे. भारत राष्ट्र हा जर एक ग्रंथ असेल तर मराठी हे त्याचे एक प्रकरण आहे. भारताच्या सार्वभौम सत्तेची उभारणी ही अनेक संस्कॄती आणि परंपरांच्या संगमातून झालेली आहे. त्यामुळेच ह्या राष्ट्राला एक संघराज्य किंवा गणराज्य म्ह्टले गेले आहे. आणि म्हणून जेव्हा आपण राष्ट्रवाद हा शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दाच्या व्याप्तीला आपण मराठी ह्या एका छोट्याशा चौकटीत बसवता कामा नये. राष्ट्रनिर्मितीमध्ये इतर संस्कॄतींचेही तितकेच योगदान आहे हे विसरून चालणार नाही.
दुसरी गोष्ट संस्कॄतीबाबत.... ओंकारने पहिला प्रश्न 'संस्कॄती म्हणजे नेमके काय?' असा विचारला आहे. वरती म्हटल्याप्रमाणे संस्कॄती ह्या शब्दाची व्याप्तीही फार मोठी आहे. संस्क्रॄती म्हणजे एखाद्या धर्माने दिलेली शिकवण, एखाद्या प्रेषिताने दिलेला संदेश किंवा एखाद्या कायद्याने लिहून ठेवलेली नियमावली नव्हे. संस्कॄती ह्या शब्दाच्या अर्थाला अनेक पैलू आहेत. सर्वात पहिला पैलू म्हणजे एखाद्या घरातली संस्कॄती. वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर, संस्कॄतीचा पहिला धडा हा आपल्या घरातच गिरविला जातो. आपण नेहमीच म्हणतो, अमूक एकजण हा एका सुसंस्कॄत कुटुंबातला आहे. याचा अर्थ असा की सर्वप्रथम संस्कॄती ही व्यक्तिगत असते. कुटुंबानंतर एखादी व्यक्ती जसजशी सामाजिक संपर्कात येत जाते तसतशी संस्कॄतीची व्याख्या व्यापक होत जाते. त्यातूनच एखाद्या गावाची संस्कॄती, एखादी प्रादेशिक संस्कॄती आणि शेवटी राष्ट्रीय संस्कॄतीचा उगम होतो. तात्पर्य असे की, संस्कॄती ही एक नियमावली नसून व्यक्तिगत सद्सद्विवेकबुध्दीपासून ते देशापर्यंत निर्माण झालेल्या समाजाचे ते एक मूल्याधिष्टान आहे.

संस्कॄती ही संकल्पना इथेच थांबत नाहे. फक्त एका देशापुरतीच मर्यादित न राहता तिची व्याप्ती पुढेही वाढतच राहते. उदा. पौर्वात्य संस्कॄती, पाश्चिमात्य संस्कॄती, मध्य आशियाई संस्कॄती, युरोपीय संस्कॄती. हे सगळे शब्द म्हणजे संस्कॄतीच्या प्रदेशातीत विस्ताराचे दाखले आहेत.
संस्कॄतीचे इतर पैलू म्हणजे धार्मिक संस्कॄती, सामाजिक संस्कॄती आणि आर्थिक संस्कॄती. जगातल्या प्रत्येक देशामध्ये जसे धार्मिक आणि सामाजिक परंपरांमधले फरक आहेत तसेच आर्थिकदॄष्ट्याही अनेक फरक आहेत. हे फरक त्या त्या देशाच्या आर्थिक संपन्नतेतून उद्भवलेले आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये सर्व प्रकारच्या ऐहिक सुखोपभोगांची साधने आर्थिक संपन्नतेने उपलब्ध करून दिलेली आहेत. तिथला सामान्य माणूस जगातील इतर सामान्यांपेक्षा जास्त आर्थिक ताकदीचा आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक संस्कॄती सढळ हाताने खर्च करायला शिकवते. परंतु भारतासारख्या देशातील सामान्य माणसाची आर्थिक संस्कॄती त्याला बचत करायला शिकवते.

पुढचे काही प्रश्न.....
"असे कोणते अंश आहेत जे केवळ मराठी संस्कॄतीतच आहेत?"
"असे कोणते अंश आहेत जे इतर संस्कॄतींमध्येही आढळतात?"
"तो प्रभाव त्यांच्यावर मराठी संस्कॄतीमुळे झाला की त्याउलट झाले?"

ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे एकमेकांमध्ये दडलेली आहेत. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, संस्कॄती ही कुठे लिहून ठेवलेली किंवा कोणी नेमून दिलेली नसते. आणि तसेच संस्कॄतीला प्रादेशिक सीमाही नसतात. प्रदेशांच्या सीमा मनुष्य ठरवतो. पण संस्कॄतीला तो कोणत्याही सीमेत अडकवू शकत नाही. उदा. भाषासंस्कॄती; भारतात जरी कित्येक प्रांतांत कित्येक भाषा बोलल्या जात असल्या तरी प्रत्येक भाषेत आपल्याला इतर संस्कॄतींमधून आलेले शब्द सापडतात. मराठीतही कित्येक शब्द उर्दू, फारसी, हिंदी, आणि इतर भाषांतून आलेले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर जगातील सर्व संस्कॄत्या काही प्रमाणात एकमेकांपासून प्रेरित असतात आणि काही प्रमाणात त्या इतर संस्कॄत्यांवर आपला प्रभाव पाडत असतात. मराठी संस्कॄती याला अपवाद नाही. शेवटी एखाद्या संस्कॄतीला जपतो तो माणूसच... आणि संस्कॄती जपतो म्हणजे तो नेमके काय करतो? आपल्या सद्सद्विवेकबुध्दीनुसार तो चांगले काय आणि वाईट काय याची शहानिशा करून आपली आचरणमूल्ये निश्चित करतो. थोडक्यात संस्कॄती जरी विश्वव्यापक असली तरी तिची जपणूक व्यक्तिगत पातळीवरच होते. म्हणजेच, संस्कॄती म्हणजे व्यक्तिगत सदाचरणाचा परिपाठ असतो. सदाचरणाची उत्पत्ती ज्ञानातून होते. आणि ज्ञान हे तर प्रदेशापुरतेच काय तर संपूर्ण ब्रम्हांडापुरतेही सीमित राहू शकत नाही. त्यामुळे, जेंव्हा मनुष्य ज्ञानाच्या प्रादेशिक सीमा ओलांडतो, तेंव्हा तो एकतर आपल्या प्रादेशिक संस्कॄतीचा प्रभाव इतरांवर पाडतो किंवा उलट इतर संस्कॄतींपासून प्रभावित होतो. मला हे म्हणायचे नाही की एखाद्या संस्कॄतीचे काही वेगळेपण नसते. निश्चितच ते असते... तसे जर नसते तर सगळ्या संस्कॄत्या आपापले अस्तित्त्व सोडून एकजीव झाल्या असत्या. प्रत्येक संस्कॄतीचा वेगळेपणा भाषा, साहित्य, आणि कला यामधून जपलेला असतो. माणसाच्या मनाची एक प्रवॄत्ती असते की अशा प्रकारचे वेगळेपण फक्त आपणच आपल्या संस्कॄतीत जपल्यासारखे त्याला वाटत असते. याचे कारण असे असते की इतर संस्कॄत्यांची ओळख तर सोडाच त्याला त्याची माहितीही नसते. यात त्याचा काही दोष नाही. ही त्याचे नैसर्गिक प्रवॄत्तीच आहे.

वरील अभिप्राय वाचून प्रश्नकर्त्याने राग मानू नये. कारण अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अनेक संस्कॄत्यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी संस्कॄतीतील ज्ञानाची देवाणघेवाण भारतातील किंवा जगातील कुठपर्यंतच्या संस्कॄत्यांशी झालेली आहे आणि कोणकोणत्या इतर संस्कॄत्यांमधील ज्ञानाचे आदानप्रदान मराठीशी झालेले आहे याचे समग्र अध्ययन करावे लागेल. इतके करूनही फक्त भाषा, रूढी-परंपरा, आणि कला यांतील संस्कॄत्यांना जोडणारे दुवेच सापडतील. व्यक्तिगत संस्कॄतीचे काय?

आणखी पुढचे काही प्रश्न.....
"मराठी माणसांनी इतर संस्कॄत्यांना किती प्रमाणात आपलेसे करावे? असे करणे अनिवार्य आहे काय? स्वराष्ट्रात असं करणं अनिवार्य कसं बरं झालं?"

हा प्रश्न मांडताना काही संभ्रम झाल्यासारखा दिसतोय....
स्वराष्ट्र कधी कुठल्या दोन संस्कॄतींना एकमेकांचा संबंध येण्यापासून रोखते काय? स्वराष्ट्रात इतर संस्कॄतींवर निर्बंध लादले जातात काय? खुद्द हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार किंवा त्यांच्या राज्यकारभारातील कागदपत्रांचे अंश वाचायला मिळाले तर जरूर वाचावे. फार लांब कशाला, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे जुन्या चौथीच्या अभ्यासक्रमातील ईतिहासाचे पुस्तक किंवा त्याच अभ्यासक्रमातील आठवीच्या मराठीच्या पुस्तकांतील दादा धर्माधिकारींचा धडा (...नाव आठवत नाही) वाचावा. त्यात शिवाजीराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला जाउन मिळालेला आपला सावत्र भाऊ व्यंकोजीच्या नावे लिहिलेले पत्र वाचायला मिळेल. त्यातली संपूर्ण भाषा ही जरी मराठी असली तरी जवळजवळ अर्ध्याहून अधिक शब्द उर्दू आहेत. (उदा. "जिम्मेदारी, मुलाहिजा, मुल्क, वतन ई.)खुद्द स्वराज्याच्या संस्थापकाने ही सांस्कॄतिक अस्पॄश्यता बाळगलेली नाही. खुलेपणाने त्यांनी मुघलांच्या भाषासंस्कॄतीचा अंगिकार केलेला आहे. कारण तसे करणे म्हणजे स्वराज्याशी प्रतारणा असे कधीच वाटले नाही. त्यांच्या अंगी तो आत्मविश्वास जन्मजातच होता. म्हणून इतर संस्कॄतीमधून आपल्याला काही शिकायला मिळत असेल तर त्याला काहीच हरकत नसावी. आपल्याला असं करताना जर स्वराष्ट्रावर आक्रमण होत आहे असं जर वाटत असेल तर माझ्या मते तो आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि आपल्या मनांतील असुरक्षिततेच्या भावनेचं द्योतक आहे. (again.... pl not to be taken personal!!!)

"मराठी संस्कॄतीचे संगोपन आणि तिचा विकास करण्यासाठी एक नीलचित्र (????) आखले पाहिजे काय?"


नीलचित्र.... ब्लू प्रिन्ट या इंग्रजी शब्दासाठी पर्यायी शब्द...
आराखडा म्हणू शकला असतास की रे...!!!! शब्दशः भाषंतर करायची काय गरज होती?.... असो.

"मराठी भाषेला व संस्कॄतीला प्रचलित व सुप्रसिध्द करण्यासाठी काय मोहिमा आखल्या पाहिजेत?"

फक्त एकच गोष्ट करायला हवी.... "मराठीला घराघरांतून सांभाळायला हवे".
नव्या पिढीला मराठी भाषा, कला आणि साहित्यक्षेत्रातील मराठी भाषेचे योगदान याची जाणीव करून द्यायला हवी. इंग्रजी भाषा आणि संस्कॄतीचे ज्ञान जरी स्पर्धात्मक युगात अत्यावश्यक आसले तरी घरांघरांतून मराठी जगली पाहिजे. मराठी भाषेत इंग्रजी शब्दांना पर्याय शोधून मराठीचे महत्त्त्व वाढत नाही किंवा इंग्रजीचेही कमी होत नाही. आपल्या भावी पिढीचाही विचार होणे गरजेचे आहे. आपली मुले जरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवावी असे मनापासून जरी वाटत असले तरी त्यांना मराठी भाषा, मराठी ईतिहास, मराठी संतसाहित्य, मराठी कलाविष्कार, मराठी लोककला इ. पासून वंचित ठेवू नये. त्यांना या सगळ्यांची ओळख पालकांनी आपली सांस्कॄतिक जबाबदारी म्हणून लहानपणापासूनच द्यायला हवी. आपल्या मुलांच्या मनामध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करायला हवी. उद्या उठून त्यांनी "Tukaram was a great poet, he was a great saint"; असं घोकत बसण्याची वेळ येवू देता कामा नये. अन्यथा तुकोबांनी म्हटल्याप्रमाणेच... "आंधळिया हाती दिले मोती जैसे वांया जाय" अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तुकोबा जसे म्हणतात... "अर्भकाचे साठी, पंते हाती धरिली पाटी", त्याप्रमाणे मातापित्यांनी आपल्या अर्भकासाठी स्वतः पंत होउन हातामध्ये पाटी धरणे आवश्यक आहे. मराठीचा 'म' शाळेत जरी शिकवला नाही तरी पालकांनी मुलांच्या हातातील पाटीवर त्यांच्यासोबत तो गिरविला पाहिजे. संस्कॄतीचा विकास जर करायचा असेल तर संस्कॄतीची जपणूक केलीच पाहिजे. आणि संस्कॄतीची जपणूक करायची तर तिच्या मुळाशी पाणी घातले पाहिजे.... म्हणजे संस्कॄतीचे उगमस्थान "घर".... तिथेच तिला जपले पाहिजे.

"इतर संस्कॄतींमध्ये 'प्रदूषित' व 'व्यसनी' झालेल्या लोकांनी मराठी संस्कॄतीकडे पुनरागमन कसे करावे"....

इथे पुन्हा एकदा संभ्रम झालेला आहे.

एखादा समाज म्हणजे "संस्कॄती" आणि "विकॄती" या दोन्ही गोष्टींचे मिश्रण असतो. आपण फक्त मराठी संस्कॄतीला सुसंस्कॄतपणाचे सर्टिफिकेट देणं चुकीचं आहे. माणूस प्रदूषित आणि व्यसनी काय फक्त इतर संस्कॄतींमुळेच होतो काय? "आपला तो बाब्या आणि दुस-याचं(dusaryaacha) ते कार्टं" अशा प्रकारचा हा न्याय झाला. विकॄती ही मराठी माणसांमध्येही होती... आहे... आणि राहणारच. महाराष्ट्रात हुंडाबळी कधीच झाले नाहीत काय? इथे चो-या लूट्मार कधीच नव्हती काय? सामाजिक विषमता इथे पूर्वापारपासून चालत आलेली आहे, म्हणूनच सामाजिक न्यायासाठी झिजलेले फुले-शाहू-आंबेडकरांसारखे नेते याच संस्कॄतीत जन्माला आले. महर्षी कर्वे, महर्षी वि.रा. शिंदेंसारखे स्त्रियांच्या हक्कासाठी लढलेले महापुरुष याच मातीत जन्मले.... का त्यांना संघर्ष करावा लागला? इथे स्त्रियांचे शोषण होत नव्हते काय? खुद्द शिवाजीराजांचा वंशज छत्रपती राजाराम हा त्याच्या जीवनाचा शेवटचा काळ वगळता ऐषारामी आणि मद्यपी होता. गोपाळ गणेश आगरकरांना उगाचच 'सुधारक' म्हटले गेले काय? काय आणि कशात सुधारणा करायची त्यांना गरज होती? गांधीजींचा खून मराठी माणसाने केला नाही काय? छोटा राजन कोण आहे....? त्याचं नाव आहे राजन निकाळजे. अरूण गवळी काय मराठी संस्कॄतीचं प्रतिनिधित्व करतो काय? गुन्ह्यांची पंढरी मुंबई ही महाराष्ट्राचीच राजधानी ना?
सांगायचा मुद्दा असा की, मराठी संस्कॄती म्हणजे काही ठोकळेबाज साचा नव्हे की ज्यात फक्त आदर्श, शुद्ध, सदाचारी लोक भरलेले आहेत. जो बाहेर गेला तो प्रदूषित आणि व्यसनी झाला. त्याला पुन्हा ह्या साच्यात बसवायचे तर काहीतरी शुद्धीकरण मंत्र वगैरे कोणाकडे आहे काय? अशा प्रकारची चिकित्सा करणारा वरील प्रश्न वाटतो. प्रश्नात मांडलेली मराठी संस्कॄतीची संकल्पना वास्तवापेक्षा स्वप्नाळू जास्त वाटते.
जो विकॄत असतो तो विकॄतीतच रमतो, त्याचे पुनरागमन संस्कॄतीकडे होत नसते. आणि झाले तरी हा काय संसदेसारखा आकड्यांचा खेळ आहे की काय?.... तुमचा एक कमी झाला, आमच्याकडे आला आणि आमचा त्यामुळे एक वाढला. जर त्याचे पुनरागमन झाले तर तो त्याच्या व्यक्तिगत प्रगतीचा भाग असतो. त्याने कुठल्यातरी प्रदेशाची संस्कॄती प्रबळ होते अशा संभ्रमात राहणे चुकीचे आहे.

पु.लं.च्या शब्दांत.....

शेवटी संस्कॄती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत... गणपतीबाप्पाची मुक्त आरोळी. केळीच्या पानातील भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी... दुस-याचा पाय चुकुन लागल्यावरदेखील आपण प्रथम केलेला नमस्कार.... दिव्या दिव्या दीपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी.... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे.... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श. कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तस ह्या अदॄश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कपबशीचा....

"पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो,
जीवन त्यांना कळले हो...
'मी'पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो,
जीवन त्यांना कळले हो."

waril likhan Orkut chya marathi rashtrawaad discussion madhil aahe...wachnaryani bodh ghenya sarkhe thode far nakkich aahe....
maazhi kiwaa aaplya saglyanchi ekach apeksha asayala hawi ki...marathi bhasha/sanskriti la begadi premachi kiwaa wayfal bhitichi garaj nasun tila kharya arthane janun ghenychi aahe...kay mhanta!

3 comments:

Ashintosh said...

हम्म. लेखाचा दुवा http://hellomarathi.com/story.php?title=--3152 इथे गवसला. लेख वाचण्यासारखा दिसतो. सवडीने वाचायला हवा!

Sacky said...

मराठी जगत आपल्या संस्कृतीचे रक्षण करताना नेहमीच उदासीन राहिले आहे. शिवाजी महाराजांच्या आणि नंतर पेशवाईत पेशव्यांनी केलेल्या राज्यप्रसाराच्या काळात मराठी संस्कृती समृद्ध झाली खरी. पण तेव्हा मराठी माणूस राज्यकर्ता होता. आता काळ बदलला... कपबशांची संख्या वाढली. वेगवेगळ्या आकाराची भांडी आपटू लागली. त्यात आपले मराठी मडके कसे टिकायचे? कुसुमाग्रज म्हणतात ते मला पटते. आपुल्या घरी घाव सोसते मराठी.

Sacky said...

मला चाणक्य सिरिअलमधला एक डायलॉग फार आवडतो. जर आपण आपल्या शास्त्र आणि संस्कृतीचे रक्षण करू शकलो नाही तर तो दोष कोणाचा? जर मला माझ्या संस्कृतीबद्दल आस्था वाटते, तर तशी इतरांना त्यांच्या संस्कृतीबद्दल असणारच. मग ते तुमच्या संस्कृतीचा स्वीकार का करतील? त्यांच्या संस्कृतीचे खंडन
करून आपल्या संस्कृतीचा विजय कधीच होणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या शास्त्र आणि संस्कृतीप्रमाणे जगून दाखवू शकाल तेव्हाच तुम्ही तुमची संस्कृती राखू शकाल.

इतरांच्या संस्कृतीतून चांगले ते उचलण्यात काहीच गैर नाही. पुन्हा भाषा हीदेखील संस्कृतीचे माध्यम असली तरी संस्कृती नव्हे. संस्कृत भाषा आपली मातृभाषा उरली नाही म्हणून काही भारतीय संस्कृती नष्ट झाली नाही. संस्कृती सतत बदलणारा ओघ आहे. आणि इतिहास साक्ष आहे की, त्या बदलाला सतत सर्व संस्कृतीतून विरोधच झाला आहे.

तुम्ही तुमची मूल्ये आणि जीवनतत्त्वे ठरवा आणि ज्या शास्त्रांत तुम्हास आस्था आहे, त्यांचे पालन करा. इतरांना त्यांच्या शास्त्रांचे करू द्या. तुमची शास्त्रे सत्यगामी असतील तर ती तुम्हाला थोडी तरी मोक्षतत्त्वाजवळ नक्कीच नेतील.